Tuesday, 6 April 2021

राजश्री प्रॉडक्शनच्या सिनेमातून राजवीर देओल आणि अवनीश बड़जात्या करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण


राजश्री प्रॉडक्शन्स (प्रा.) लिमिटेडचे नाव बॉलिवूडमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. राजश्रीच्या आजवरच्या इतिहासात संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन होईल असेच सिनेमे तयार केले गेले आहेत आणि यापुढेही राजश्री प्रॉडक्शन हीच परंपरा पुढे सुरु ठेवणार असल्याचे त्यांच्या मागील काही सिनेमांवरूनही दिसून येते. गेल्या ७ दशकांपासून राजश्री प्रॉडक्शन कौटुंबिक मनोरंजक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असून आता बड़जात्या कुटुंबातील चौथी पिढीही राजश्रीचा हा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे.


राजश्री प्रॉडक्शनने तीन दशकांपूर्वी सूरज बड़जात्याच्या कल्पनेवर आधारित 'मैंने प्यार किया' सिनेमा तयार केला. सलमान खानचा नायक म्हणून हा पहिला सिनेमा होता. या सिनेमातून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये नायिका म्हणून पदार्पण केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होताच, विशेष म्हणजे आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. ज्याप्रमाणे सूरज बड़जात्याच्या कल्पनेला राजश्री प्रॉडक्शनने वाव दिला होता तसेच आता सूरजचा मुलगा अवनीशची कल्पनाही उचलून धरली असून आता अवनीश बड़जात्याही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरत आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या या नव्या सिनेमाचे लेखनही अवनीश बड़जात्यानेच केले आहे.


विशेष म्हणजे सूरज बड़जात्याने ज्याप्रमाणे सलमान खानला संधी दिली होती त्याचप्रमाणे अवनीश बड़जात्याही राजवीर देओलला या सिनेमातून नायकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर आणणार आहे. राजवीर हा मेगा स्टार सनी देओलचा धाकटा मुलगा आहे.


राजवीरने थिएटरचे संपूर्ण शिक्षण यूकेमध्ये घेतले. त्यानंतर त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. प्रख्यात थिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्रशिक्षण घेतले. आणि आता राजवीर राजश्रीच्या सिनेमातून नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.


राजवीरबाबत बोलताना अवनीश बड़जात्याने सांगितले, “राजवीरचे डोळे खूप बोलके आहेत. तो  डोळ्यांनी बोलतो. त्याच्याकडे एक वेगळा मूक करिश्मा असून तो खूप मेहनती आहे. माझ्या या सिनेमातील नायकाच्या भूमिकेसाठी तो अत्यंत सूट आहे. त्याच्याशी सिनेमाबाबत चर्चा करताना तो नायक म्हणूनच माझ्या डोळ्यासमोर सतत येत असतो.”


राजश्रीचा हा नवा सिनेमा एक प्रेमकथा असून आजच्या जगात प्रेम आणि नातेसंबंध या संकल्पनेशी संबंधित आहे. राजवीरच्या नायिकेचा शोध सुरु करण्यात आला असून हा सिनेमा याचवर्षी जुलैमध्ये फ्लोअरवर जाणार असून २०२२ मध्ये रिलीज करण्याचा राजश्री प्रॉडक्शनचा विचार आहे.